‘विद्यापीठ परीक्षेत दयानंद कला महाविद्यालयाचे घवघवीत यश’
लातूर – गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत दयानंद कला महाविद्यालयाने यावर्षीही पदवी व पदव्युत्तर विभागात घवघवीत यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये पदवी व पदव्युत्तर परीक्षेत 17 गुणवंत विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान मिळविले आहे. या गुणवंतांचा गौरव करण्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव मा.श्री. रमेशजी बियाणी, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड व महाविद्यालयातील विविध विभागातील विभाग प्रमुख व प्राध्यापक तसेच प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. लक्ष्मीरमणजी लाहोटी यांनी विद्यार्थ्यांना गौरान्वित करत त्यांनी महाविद्यालयाच्या गुणवत्तेतील सातत्याचा पुनर्उल्लेख करत, यावर्षी गुणवंत विद्यार्थ्यांनी महाविद्यायाच्या परंपरेने लाभलेली शौक्षणिक गुणवत्ता राखली आहे, असे मत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे सचिव मा. श्री. रमेशजी बियाणी यांनी विद्यार्थ्यांनी सदैव प्रयत्नशील राहून आपल्या उन्नतीकडे अग्रेसित राहणे आवश्यक आहे, याचीच परिणिती म्हणजे आजचा हा गुणवंत गौरव सत्कार कार्यक्रम होय असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांना ह्या स्पर्धेच्या काळात लागणाऱ्या सर्व नवीन वस्तुंची उपलब्धता संस्थेच्या सहाय्याने पुरवणे या अगोदर शक्य झाले आहे तसेच भविष्यातही पुरविण्यात येतील. दयानंद शिक्षण संस्थेकडून विद्यापीठात गुणानुक्रमे सर्वप्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्यास अनुक्रमे रू. 5000/-, रू. 3000/- व रू.2000/- चे पारितोषिक देण्यात येते. याकार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांचा गौरव करून संस्था अध्यक्ष मा. लक्ष्मीरमणजी लाहोटी व सचिव मा. श्री. रमेशजी बियाणी यांच्या हस्ते पारितोषकाचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. लक्ष्मीरमणजी लाहोटी, सरचिटणीस मा. रमेशजी बियाणी, प्र.प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आदिंनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सुभाष कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थ्यानी केले.